विधानसौध परिसरात विविध मागासवर्गीय समाजातर्फे आंदोलन
बेळगाव : धार्मिक, शैक्षणिक, राजकीयरीत्या मागासलेल्या समाजाचा 2ए मध्ये समावेश करावा, कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणाचा अहवाल तात्काळ सादर करावा, देवराज अरस या मागासवर्ग विकास महामंडळासाठी अडीच हजार कोटींची अतिरिक्त तरतूद करावी, शासकीय महामंडळामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकपदावर मागासवर्गीयांना प्राधान्य द्यावे, मागासवर्गीयांना देण्यात येणाऱ्या एकूण अनुदानात वाढ करावी आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य मागासवर्गीय विविध जातींकडून बुधवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. यामध्ये दलित, धनगर, मुस्लीम व इतर मागासवर्गीय समाजाचे बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.
धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या मागासलेल्या मागासवर्गीय समाजाचा 2ए मध्ये समावेश करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. शिवाय याबाबत सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मागासवर्गीय समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी देवराज शासकीय विकास महामंडळासाठी अडीच हजार कोटींची अतिरिक्त तरतूद करावी, त्याबरोबर शासकीय महामंडळांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक पदांसाठी मागासवर्गीयांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.









