भाजप युवा मोर्चातर्फे मागणी : मंत्री व्ही. सोमण्णा यांना निवेदन
बेळगाव : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बैलहोंगलला रेल्वे संपर्क व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा आघाडी बैलहोंगल शाखा व बेळगाव ग्रामीण शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांना पाठविले आहे. बैलहोंगल तालुक्याचे स्वातंत्र्यलढ्यात भरीव योगदान आहे. बैलहोंगल शहरामध्ये वीर राणी चन्नम्माचे स्मारक, क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णांच्या जन्मस्थळी संगोळ्ळी येथे सैनिक शाळा व उद्यान उभारण्यात आले असून ही पर्यटनस्थळे बनली आहेत. पर्यटकांचा या स्थळांवर नेहमी ओघ असतो. नजीकच असलेल्या सौंदत्ती येथील शक्तीपीठ यल्लम्मा डोंगरावर दर्शनासाठी विविध राज्यांतून भाविक येत असतात. बैलहोंगल तालुक्यात चार साखर कारखाने, सुत गिरण्या, धान्य विक्री केंद्रे यांनी बैलहोंगलला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे तालुक्यात नेहमी वर्दळ असते. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरी बैलहोंगलला रेल्वे संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा विचार सरकारने केलेला नाही. बेळगाव-धारवाड या नव्या रेल्वे मार्गावरून हिरेबागेवाडी ते बैलहोंगल, बेळवडी, सौंदत्तीमार्गे रेल्वे संपर्क व्यवस्था करून दिल्यास पर्यटकांबरोबर यात्रेकरुंनाही सोयीचे होईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना भाजपचे प्रशांत अम्मीनभावी, सचिन कडी तसेच राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी उपस्थित होते.









