शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांच्या सूचना : बेळगाव जिल्ह्याचा घेतला शैक्षणिक आढावा
बेळगाव : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. खासगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळा चालवून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण व साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा यांनी केली. मंगळवारी बेळगावच्या सुवर्णविधानसौध येथे आयोजित बेळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक आढावा बैठकीत ते बोलत होते. विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असलेल्या शाळांकडे लक्ष देऊन मुलांना शाळेपर्यंत आणण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. प्रत्येक घराला भेट देऊन ‘शाळेत या’ ही मोहीम सुरू करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
सरकारी शाळांमधील मुलांना मोफत गणवेश, जेवण, तसेच पुस्तके दिली जातात. 30 जुलैपर्यंत शाळा प्रवेश खुले आहेत. अद्याप जे विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत, त्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी शिक्षक, तसेच अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. शाळांना अचानक भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घ्यावी. गोकाक व रायबाग तालुक्यातील शाळांमधील उपस्थिती कमी होत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी आमदार महांतेश कौजलगी, आमदार दुर्योधन ऐहोळे, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, बेळगाव शैक्षणिक विभागाच्या अतिरिक्त आयुक्त जयश्री शिंत्रे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
जीर्ण वर्गखोल्यांबाबत खबरदारी घ्या : हिरेमठ
सरकारी शाळांच्या अनेक इमारती सध्या जीर्ण झाल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी वर्गखोल्या कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने जीर्ण वर्गखोल्यांबाबत खबरदारी घेऊन त्याची माहिती शिक्षण विभागाला द्यावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्ह्यात रिक्त पदांवर अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जीर्ण वर्गखोल्यांची पाहणी करून दुरुस्ती व बांधकामासाठी जिल्हा पंचायतच्या अनुदानातून निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी सांगितले.









