केंद्रीय गृह मंत्रालयाची राज्यांना सूचना : दहशतवादी, खलिस्तान्यांकडून धोक्याच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
परदेशात छुप्या पद्धतीने भारतविरोधी अजेंडा राबवणाऱ्या खलिस्तानी संघटना आणि त्यांच्या सदस्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा (एनआयए) सातत्याने काम करत आहे. दरम्यान, तपास करणाऱ्या एनआयए अधिकाऱ्यांना दहशतवादी संघटना, खलिस्तानवादी नेते आणि नक्षलवाद्यांकडून धमक्मया येत असल्याची माहिती समोर आली आहे. या धोक्यामुळे गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून एनआयए अधिकाऱ्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशाच्या विविध दुर्गम भागात छापे मारताना पुरेशी सुरक्षा पुरवण्याची सूचना विविध राज्य सरकारांनाही करण्यात आली आहे.
दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) पाकिस्तानच्या आयएसआयच्या सहकार्याने भारताच्या इतर गुप्तचर युनिट्ससह एनआयए अधिकाऱ्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही वृत्त आहे. तसेच परदेशात खलिस्तानी गटांच्या विरोधाचा सामना करणाऱ्या वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांना अल-बद्रकडून थेट धमकी आल्याने गृह मंत्रालय अलर्ट झाले आहे. त्यामुळेच राज्यात एनआयएकडून धाडसत्र सुरू असताना अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात यावा, असे गृह मंत्रालयाने राज्यांना सुचवले आहे. पीएफआय, मुजाहिदीन गजवातुल हिंद, आरपीएफ/पीएलए सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या आयएसआयच्या सहकार्याने एनआयएसह गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती गृह मंत्रालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळेच सर्व राज्य प्रशासनांना एनआयए अधिकाऱ्यांना त्यांच्या भेटीदरम्यान सुरक्षा प्रदान करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
10 दिवसात 100 हून अधिक छापे
छाप्यांच्या कारवाईवेळी एनआयए अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्मयता आहे. गेल्या 10 दिवसात एनआयएने देशाच्या विविध भागात नक्षलवादी आणि खलिस्तानी दहशतवादी गटांशी संबंधित 100 हून अधिक छापे टाकल्याचे गुप्तचर संस्थांमधील उच्च सूत्रांनी सांगितले. तपास आणि पुरावे गोळा करण्यासह त्यांची विविध कर्तव्ये पार पाडताना एनआयए अधिकाऱ्यांना दुर्गम ठिकाणे आणि दहशतवादग्रस्त भागांना भेटी द्याव्या लागतात. या भेटीवेळी त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात, अशी भीती गृह मंत्रालयाने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.









