सामाजिक संघटनांचा आंदोलनाचा इशारा
बेळगाव : तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारात लाकडी ओंडका टाकून वाहन पार्किंगला निर्बंध करण्यात आले आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तहसीलदारांनी याची तातडीने दखल घेऊन नागरिकांना वाहन पार्किंगची सोय करून द्यावी अन्यथा विविध संघटनांकडून या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसील कार्यालयात विविध कामांनिमित्त येणाऱ्या नागरिकांची कायम वर्दळ असते. बेळगाव वन कार्यालय असल्याने विविध प्रकारचे कर भरण्यासाठी तसेच इतर कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र याठिकाणी वाहन पार्किंग करण्यासाठी सोय नसल्याने नागरिकांची मोठी गोची होत आहे. यापूर्वी तहसीलदार कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारातून वाहनांना ये-जा करण्यासाठी सोय होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून एका बाजूचे प्रवेशद्वार वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या वाहनाला ये-जा करण्यासाठी सोय आहे तर दुसऱ्या बाजूने असणाऱ्या गेटसमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत नागरिकांना दुचाकी पार्किंग करण्यासाठी सोय होती. ती आता बंद करण्यात आली आहे. नागरिकांना रस्त्यावर वाहने पार्किंग करावी लागत आहेत. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. रहदारी पोलिसांनी याची त्वरित दखल घेऊन कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या जागेत पार्किंगची सोय करून द्यावी. पूर्वीप्रमाणे दोन्ही प्रवेशद्वार वाहतुकीला मोकळे करून द्यावेत अन्यथा होणाऱ्या गैरसोयीविरोधात तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सामाजिक संघटनांनी घेतला आहे.









