शेतकरी संघटनेच्यावतीने पालकमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव ; शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे करणे कठीण झाले आहे. त्यातच सरकारच्या मोफतच्या योजनांनी अजून भर पडणार आहे. त्यामुळे आता सरकारनेच आम्हाला शेतमजूर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शेती करण्यासाठी शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. बेळगाव तालुका हा शहरापासून जवळ असल्याने आणि उद्योगधंदे लगेच उपलब्ध होतात याचा परिणाम शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या नरेगामुळे महिला मजुरांची संख्याही कमी झाली आहे. याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होत असून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात मजूर उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हेस्कॉमकडून भरमसाट वीज बील देण्यात आले असून हे भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही. नागरिकांचा विचार करून वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. तसेच बेळगाव जिल्ह्यातील एका शेतकरी नेत्याला विधानपरिषदेवर घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक उपस्थित होते.









