महिलांनी निवेदनाद्वारे केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर भाविकांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधी भारतीय संस्कृती फौंडेशनच्या माध्यमातून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जोगुळभावी परिसरात भाविक मोठ्या प्रमाणात पवित्र स्नान करतात. त्याठिकाणी शौचालय, पिण्याचे पाणी व कपडे बदलण्यासाठी आसरा नाही. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर येतात. मात्र, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. सौंदत्ती यल्लम्मा मंदिर 10 प्रमुख मंदिरांतील एक आहे. खासकरून पौर्णिमेच्यावेळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. व्हीआयपींसाठी वेगळ्या दर्शनाची व्यवस्था आहे. तसेच 100 रुपये घेऊन तात्काल दर्शनाची सोय केली जाते. मात्र, देवीच्या दर्शनाची आस घेऊन डोंगरावर येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना ते परवडणारे नाही. 100 रुपये मोजले नाही तर तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. तिरुपती बालाजी, शिर्डा साईबाबा आदी ठिकाणी व्यवस्थितपणे दर्शनाची सोय आहे. तशीच व्यवस्था डोंगरावरही करण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा प्रमोदा हजारे, सुनीता सुभेदार, अनुराधा सुतार, वर्षा डोकणेकर, सुधा भातकांडे, संध्या वर्पे, गीता हलगेकर, वर्षा आजरेकर, निकिता मनवाडकर, अश्विनी हलगेकर, मंजुळा शहापूरकर, पूजा जाधव आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
ज्येष्ठ नागरिक-दिव्यांगांसाठी मोफत दर्शनाची सोय करा
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी मोफत दर्शनाची सोय करावी. महाराष्ट्रातील भाविकांनी यापूर्वी अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे. स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, जोगुळभावी व येन्नीहोंडजवळ महिलांसाठी चेंजिंग रूम, पार्किंगची व्यवस्था, गर्दीत हरवलेल्यांसाठी हेल्पलाईनची मागणी केली आहे.









