बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सची जि.पं. सीईओंकडे मागणी
बेळगाव : बेळगावनजीक औद्योगिक वसाहतीसाठी मोठी जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यास याचा फायदा उद्योगाना होईल. सध्या बेळगावमधील अनेक उद्योग, तयार केलेले साहित्य इतर देशांना निर्यात करते. त्यामुळे मोठा महसूल मिळत असून, रोजगार वाढविण्याची क्षमता बेळगावमध्ये आहे. परंतु जागा उपलब्ध नसल्याने उद्योगाचा विस्तार करणे अवघड होत आहे. त्यामुळे एखादी मोठी जागा औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्यावतीने जि. प. सीईओ राहुल शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सोमवारी शिंदे यांची भेट घेऊन उद्योगांसमोरील अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शेजारील धारवाड जिल्ह्यात उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचप्रमाणे बेळगावमध्येही सरकारी जागा दिल्यास उद्योगांचा विस्तार करणे सोयीचे होणार आहे. बेळगाव व गोवा वाहतुकीसाठी सोयीचे होईल, अशी जागा देण्याची विनंती त्यांच्याकडे करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, सेक्रेटरी सतीश कुलकर्णी, खजिनदार संजय पोतदार, स्वप्निल शहा, आनंद देसाई, विक्रम जैन, संदीप बागेवाडी, एम. के. हेगडे व इतर उपस्थित होते.









