अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सहावी गॅरंटी लागू करा : एआयटीयूसीचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
बेळगाव : बांधकाम कामगारांच्या मुलांना सोयीसुविधा पुरवा, असंघटित कामगारांना किमान वेतन व इतर शासकीय सुविधा पुरवा, अंगणवाडी साहाय्यिकांना 15 हजार तर मदतनीसांना 10 हजार रुपये मासिक वेतन द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपये निवृत्ती वेतन द्या, गुजरात न्यायालयाच्या धर्तीवर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवा, मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करा आदी मागण्यांसाठी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (एआयटीयूसी) तर्फे आंदोलन छेडून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.
असंघटित बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे किट, लॅपटॉप, टॅब आणि शिष्यवृत्ती व इतर सुविधा तातडीने पुरवा, काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या काळात सहावी गॅरंटी योजना म्हणून अंगणवाडी सेविकांना मासिक 15 हजार व मदतनीसांना 10 हजार रुपये वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. ही सहावी गॅरंटी तातडीने अमलात आणावी, अशी मागणीही साहाय्यिकांनी केली.
मध्यान्ह आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यामुळे मध्यान्ह आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. यासाठी मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना मासिक 10 हजार रुपये देण्यात यावेत, त्याबरोबर अंगणवाडी सेविकांना निवृत्ती वेतन 3 लाख रुपये द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. असंघटित कामगारांच्या मुलांना लॅपटॉपचे वाटप केले जाते. मात्र सद्यस्थितीत मुलांना लॅपटॉप मिळालेले नाहीत. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी आरोग्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही कामगारांनी केली आहे.









