ग्रामीण-दुर्गम भागात आरोग्याच्या सुविधा : आंदोलनाद्वारे विधानसौध परिसरात मागणी
बेळगाव : पारंपरिक वैद्यकीय हा भारतीय वैद्यकीय परंपरेचा मूळ पाया आहे. अशा वैद्यकीयांना सरकारने सुविधा पुरवाव्यात, यासह इतर मागण्यांसाठी पारंपरिक वैद्यांनी बुधवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडले. पिढ्यान्पिढ्या जपलेल्या पारंपरिक वैद्यकीय व्यवसायाला मान्यता द्या, प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर वनौषधी वनस्पतींची लागवड करा. त्याबरोबरच वैद्यभवन उपलब्ध करा, पारंपरिक वैद्यांना दरमहा मानधन द्या, पारंपरिक संमेलनासाठी विशेष निधी उपलब्ध करा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन झाले. गेल्या 25 वर्षांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पारंपरिक वैद्य आरोग्यसेवा देत आहेत. विशेषत: घरोघरी जाऊन उपचार केले जात आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात पदवीधर डॉक्टर उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत पारंपरिक वैद्य आरोग्याच्या सुविधा पुरवतात. अशा वैद्यांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना रेल्वे आणि बसचा प्रवास केला जातो. त्यामुळे पारंपरिक वैद्यांना मोफत बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पारंपरिक वैद्यांना दरमहा मानधन द्या
त्याबरोबर विविध ठिकाणी आरोग्याच्या सुविधा पुरविणाऱ्या पारंपरिक वैद्यांना दरमहा मानधन देण्यात यावे. कन्नड साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पारंपरिक उपचार करणाऱ्या वैद्यांसाठी तीन दिवशीय संमेलन भरविण्यात यावे, यासाठी विशेष निधीही उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात आली.









