कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह-निवासी शाळा नोकर संघाची मागणी
बेळगाव : समाज कल्याण, मागासवर्गीय कल्याण खाते, कर्नाटक वसती शिक्षण संस्था, अल्पसंख्याक कल्याण खाते, कस्तुरबा वसतिशाळा, अल्पसंख्याक व मागासवर्गीय खाते आदी कार्यालयांच्या वसतिगृह आणि निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआय, पीएफ आणि इतर सोयीसुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह आणि निवासी शाळा नोकर संघातर्फे आंदोलन छेडण्यात आले. वसतिगृह आणि निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन असह्या होऊ लागले आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीपर्यंत सेवासुरक्षा देण्यात यावी. त्याबरोबर ईएसआय, पीएफ आणि इतर सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. निवासी शाळांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. वसतिगृह आणि निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून त्याबरोबर कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान वेतन देण्यात यावे. निवृत्तीनंतर देखभालीसाठी पाच लाखाची मदत द्यावी. त्याबरोबर पदवीपूर्व मुलांसाठी असलेल्या वसतिगृहांमध्ये कायमस्वरुपी वॉचमन नेमावा आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले.









