अखिल कर्नाटक माजी सैनिक असोसिएशनची आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : माजी सैनिकांना राज्य सरकारी भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण द्यावे. महामार्गावरील टोलनाका मोफत करावा. राज्य सरकारच्या सेवांमध्ये हैदराबादप्रमाणे बढती द्यावी, शहीदांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये देण्यात यावेत, शहीदांच्या पत्नीला सोयी, सुविधा पुरवाव्यात, बेळगाव जिल्ह्यात माजी सैनिक भवन उभारावे आदी मागण्यांसाठी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघातर्फे विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. सैन्यात सेवा बजावून आलेल्या माजी सैनिकांसाठी राज्य सरकारी भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण लागू करावे. माजी सैनिकांना सर्व टोल नाक्यावर मोफत प्रवास दिला जात आहे. मात्र बागेवाडी, हत्तरगी टोल नाक्यावर टोल आकारला जात आहे. त्यामुळे सर्वच टोल नाक्यावर माजी सैनिकांच्या वाहनांना टोल आकारणी करू नये. माजी सैनिक कोट्यांतर्गत कर्नाटक सरकारमध्ये सेवा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना हैदराबादप्रमाणे सेवेत बढती द्यावी, शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने किमान 5 लाख रुपये मदत द्यावी. त्याबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या वीर पत्नीला सोयी, सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सैनिकांच्या सोयी, सुविधांसाठी जिल्ह्यात माजी सैनिक भवन उभारावे. यासाठी जागा मंजूर करून द्यावी, अशी मागणी अखिल कर्नाटक माजी सैनिक असोसिएशनच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









