पत्रकार परिषदेत तृतीय पंथीय संघटनेच्यावतीने मागणी
बेळगाव : राज्य सरकारने 2025-26 सालाच्या अर्थसंकल्पात तृतीय पंथियांच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी तृतीय पंथीय संघटनेच्यावतीने शनिवार दि. 1 रोजी कन्नड साहित्य भवन येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली. राज्यात सत्ताधारी काँग्रेस पक्ष सत्तेत येण्यापूर्वी आपल्या जाहीरनाम्यात तृतीय पंथियांच्या विकासासाठी वार्षिक 200 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. तृतीय पंथियांना घरकुल सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या समाजासाठी घराची स्वतंत्र योजना सुरू करावी. तृतीय पंथियांच्या शस्त्रक्रियेनंतरच्या सहा महिन्याच्या काळासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी. त्यांना एक टक्का आरक्षण मिळावे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षाला 200 कोटींची तरतूद करावी, यासाठी वेगळा नियम करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी किरण बेडी, प्रकाश मराठे, संपतू दोडमनी आदी उपस्थित होते.









