संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : येत्या अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठी 5 कोटी रुपये निधी राखीव ठेवण्यात यावा, याबरोबरच समुदाय भवन, भूखंड व इलेक्ट्रिकल बाईक घेण्यासाठी शून्य व्याजदराने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन वृत्तपत्र विक्रेता संघ बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यामध्ये पहिल्यांदाच वृत्तपत्र विक्रेत्यांना कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना समाजात मानाचे स्थान निर्माण झाले आहे. याबरोबरच त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी अपघाती विमा जाहीर केला आहे. 2018 मध्ये विक्रेत्यांच्या विकासासाठी 2 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, त्या निधीचा विनियोग करण्यात आलेला नाही. आश्वासनांची अंमलबजावणीही झालेली नाही. राज्य सरकारकडून 2024-25 चा अर्थसंकल्प लवकरच मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठी 5 कोटी रुपये निधी राखीव ठेवावा, विक्रेत्यांसाठी समुदाय भवन निर्माण करून देण्यात यावे, विक्रेत्यांना अनुकूल होईल यादृष्टीने बेंगळूरसह जिल्हा केंद्राच्या ठिकाणी भूखंड मंजूर करून देण्यात यावेत. तसेच इलेक्ट्रिकल दुचाकी घेण्यासाठी विक्रेत्यांना शून्य व्याजदराने कर्जसुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दीपक राजगोळकर, उपाध्यक्ष श्रीकांत नेवगी, सचिव राजू भोसले, प्रताप भोसले, संजय कदम, दीपक गणाचारी आदी उपस्थित होते.









