आमदार फंडातून फक्त 5 लाखाचा निधी मंजूर : यात्रा कमिटी-पं. सदस्यांनी घेतली अंजली निंबाळकर यांची भेट
खानापूर : नंदगड यात्रा अगदी तोंडावर येऊन ठेपली असूनदेखील नंदगड येथील विकासकामे करण्यात ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने विकासकामे राबवलेली नाहीत. त्यामुळे यात्रेत फार मोठा गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावच्या विकासासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे ग्रा. पं. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आमदार फंडातून फक्त 5 लाखाचा निधी विकासकामासाठी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून विकासकामे राबविण्यात आली नसल्याचे यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार अंजली निंबाळकर यांची भेट घेऊन विकासकामे राबविण्यासाठी निधी द्यावा, अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी यात्रा कमिटीशी सविस्तर चर्चा करून समस्यांबाबत संपूर्ण माहिती घेतली. यात्रेत राजकारण न आणता सर्वांनी नंदगड गावची यात्रा सुरळीत पार पाडू, तसेच यात्रेसाठी सरकारदरबारी प्रयत्न करून विकासासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यात्रा कमिटीच्या सदस्यांना दिले.
तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आज नंदगड येथे बैठक
यावेळी अंजली निंबाळकर यांनी पीडीओंशी संपर्क साधून विकासकामाबद्दल माहिती घेतली. मात्र विकासकामेच राबविण्यात आली नसल्याने तसेच यात्रा अवघ्या 25 दिवसावर येऊन ठेपली असल्याने माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक नंदगड येथे घेण्याचे जाहीर केले असून, आज शुक्रवार दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता नंदगड ग्राम पंचायत येथे अधिकाऱ्यांसमवेत विकासकामे तसेच यात्रा काळातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या उपस्थित राहणार आहेत. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, पंचायत अध्यक्ष यलाप्पा गुरव, कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष महांतेश राऊत, शंकर सोनोळी, वैष्णवी पाटील, नागू पाटील, मन्सूर तहसीलदार, रोहीत गुरव, मष्णू कुंभार्डेकर, राजू कब्बूर, नागू देसूरकर, तुकाराम गावडा, शिवाजी पाटील, तुकाराम गावडा, हणमंत किणयेकरसह बरेचजण उपस्थित होते.









