शिवस्वराज्य संघटनेची मागणी, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन : शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा
खानापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी युरिया तसेच किटकनाशक औषधे आणि बी-बियाणे योग्य किंमतीत आणि वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट त्वरित थांबविण्यात यावी, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिवस्वराज्य संघटनेच्यावतीने कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे बुधवारी देण्यात आला. यावेळी अभिजीत सरदेसाई, रमेश धबाले, नागेश भोसले, प्रभू कदम, सुधीर नावलकर, संदेश कोडचवाडकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी शेती मशागतीची कामे करत आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी पेरणीही सुरू आहे.
मात्र तालुक्यातील खतविक्री केंद्रातून आणि खासगी दुकानातून युरियासह इतर खतांची जादा किमतीने विक्री करण्यात येत असून, युरियाचा पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यावर इतर खते घेण्याची जबरदस्ती करण्यात येत आहे. दोन पोती इतर खते घेतल्यास एक पोती युरिया खत देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व्यापारी वर्गाकडून आणि खत विक्री केंद्रातून होत आहे. यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने यावर निर्बंध घालून युरियाचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच खरिपासाठी लागणारी बी-बियाणे, किटकनाशके आणि तृणनाशक औषधे आणि युरियासह इतर खते तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला.
कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नियोजन ढासळले
निवेदनाचा स्वीकार करून आपण योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन देण्यात आले. मात्र आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नियोजन ढासळले असल्याचे कृषी अधिकारी सतिश माविनकोप यांनी शिष्टमंडळाला सांगितले.









