डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचा हलगी मोर्चा
बेळगाव : सुळगा (हिं.) येथे मागासवर्गीय कल्याण खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या इंदिरागांधी वसती शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्या विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाच्यावतीने तालुका मागासवर्गीय कल्याण खात्याच्या कार्यालयावर हलगी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. इंदिरागांधी वसती शाळा सुरू करण्यात आली असून, सुळगा येथे भाडेतत्त्वावर इमारत घेऊन ही शाळा भरविली जात आहे. 250 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जात आहे. नियमानुसार जेवणामध्ये विविध पदार्थ असणे आवश्यक आहे. त्याचे पालन केले जात नाही. स्वच्छताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वसतीगृहातील वसतीगृहाच्या वॉर्डन व शाळेच्या मुख्याध्यापकांकडून याकडे लक्ष दिले जात नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. बेजबाबदार व्यक्तिंची बदली करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन
जिल्हा पंचायत उपमुख्यकार्यकारी अधिकारी बसवराज हेग्गनाईक यांना निवेदन देण्यात आले. घटनास्थळी भेट देवून शाळेची पाहणी करून दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा लक्ष्मी कोलकार, भरमू कुर्ली व कार्यकर्ते उपस्थित होते.









