वकिलांचे जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : येथे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कायमस्वरुपी पीठ स्थापन करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक इमारत उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नाही. याची तातडीने दखल घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली दिले. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे संचार पीठ कायमस्वरुपी स्थापन करण्यासाठी शिफारस केली आहे. त्यासाठी इमारत निवड करणे आवश्यक आहे. याबरोबरच ग्राहक आयोगाच्या अतिरिक्त न्यायालयासाठीही स्वतंत्र कक्ष व कर्मचारी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या सुविधा नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर पीठासाठी इमारत नसल्याने तक्रारदारांना होणाऱ्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी जिल्हा पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून 13 रोजी जिल्हा ग्राहक आयोगाच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मागणींची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. निंगाप्पा मस्ती, अॅड. विनोद पाटील, अॅड. गंगाधर शगुनशी, अॅड. रोहित लातूर, अॅड. चेतन हेगडे उपस्थित होते.









