विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : साऊथ इंडियन दिव्यांग पुनर्वसन संस्था, कलबुर्गी ही गेल्या 35 वर्षांपासून दिव्यांगांना शिक्षण आणि सोयीसुविधा पुरवत आहे. मात्र, शासनाकडून कोणतेच अनुदान मिळत नाही. इतर संस्थांना शासन ज्याप्रमाणे अनुदान उपलब्ध करून देते, त्याप्रमाणे साऊथ इंडियन दिव्यांग पुनर्वसन संस्थेला अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. या संस्थेला 100 एकर जमीन आणि शिक्षण विभागाने पायाभूत सुविधांसाठी 100 कोटी अनुदान द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. इतर संस्थांना राज्य सरकारने अनुदान उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या संस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. दिव्यांगाचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला केवळ बालभत्ता म्हणून तुटपुंजी मदत दिली जाते. मात्र, यावर संस्था चालविणे अवघड आहे. यासाठी दिव्यांगांच्या भवितव्यासाठी सेवा देणाऱ्या संस्थेला शासनाने सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. संस्थेतील मुलींच्या वसतिगृह इमारतीसाठी 5 कोटींचे अनुदान जाहीर करावे. तसेच शाळेला अनुदान उपलब्ध करून द्यावे. संस्थेत विनामूल्य शिक्षण दिले जात आहे. मात्र, शासनाकडून कोणतीच सुविधा मिळत नसल्याची तक्रारदेखील निवेदनात करण्यात आली आहे.









