विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : दिव्यांग व्यक्तींची ग्राम पंचायत, तालुका पंचायत आणि शासकीय कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांना तुटपुंज्या वेतनावर सुविधांअभावी काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. शासनाने दिव्यांग व्यक्तींना नोकरीत कायम करून सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी कर्नाटक राज्य दिव्यांग आणि विविध संघटनांच्यावतीने करण्यात आली आहे. शासनाने शासकीय कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले आहे. मात्र, त्यांना सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे कमी वेतनावर काम करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. दिव्यांगांना मेडिकल, पेन्शन आणि इतर कोणत्याच सुविधा नसल्याने जगणे कठीण होऊ लागले आहे. गावपातळीवर आणि तालुका पातळीवर सेवा बजावत असले तरी कोणत्याही सेवासुरक्षा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे दिव्यांगांना किमान वेतनाबरोबर सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही कर्नाटक राज्य दिव्यांग आणि इतर संघटनांतर्फे करण्यात आली आहे.









