महापालिका सफाई कामगार हितरक्षण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : महापालिका सफाई कामगार हितरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन सफाई कामगारांच्या बेरोजगार मुलांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याची मागणी केली. तसेच नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या मॅन्युअल स्कॅव्हेंजर सर्वेक्षणात बेळगाव शहरात 386 कुटुंबांना कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत, अशी तक्रार राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांची भेट घेऊन करण्यात आली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांना पदाधिकाऱ्यांनी दिली. सर्व 386 कुटुंबाना घरे म़ंजूर करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.
तसेच 70 तरुण-तरुणी मॅन्युअल स्कॅव्हेंजर कुटुंबातील असून, पुनर्वसन योजनेंतर्गत त्यांचा विचार व्हावा, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्यांमध्ये महापालिका सफाई कामगार हितरक्षण समितीचे अध्यक्ष दीपक वाघेला, मुख्य सचिव विजय निरगट्टी, मानद अध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, समितीच्या महिला शाखा उपाध्यक्षा मालती सक्सेना, महिला सचिव सुधा, संघटना सचिव यल्लेश बळ्ळारी, दलित नेते मल्लेश चौगुले आदींचा समावेश होता.









