कबनूर वार्ताहर ,
Kolhpaur : तिळवणी (ता.हातकणंगले) येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन वीज कनेक्शन जोडणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या कार्यालयासमोर १ मार्च रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा तिळवणी ग्रामपंचायतने निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना दिलेला आहे,अशी माहिती सरपंच राजेश पाटील व उपसरपंच दीपक गायकवाड यांनी दिली.
तिळवणी तालुका हातकणंगले येथे गावामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत नवीन नळपाणीपुरवठा योजनेची सर्व कामे झाली आहेत. पंचगंगा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जॅकवेलमध्ये मोटरपंप बसविण्यात आलेली आहे. मोटर पंप ठेवण्याकरिता जागा उपलब्ध असल्याचे पत्र तिळवणी गावास दिलेले आहे.या ठिकाणी व तिळवणी गावातील साठवण टाकीत जलशुद्धीकरण केंद्राकरिता नवीन वीजकनेक्शन मागणी केली आहे.
गेली दीड वर्षापासून ग्रामपंचायत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही देखील अद्यापही वीज जोडणी करून दिलेली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चौदा गाव योजनेचे मागील थकबाकी दोन कोटी,बावन्न लाख,एक्कावन हजार,आठशे ऐंशी रुपये इतकी आहे. वीज मंडळाकडून हे कारण वारंवार पुढे करून हे बिल भरल्याशिवाय वीज कनेक्शन देता येत नाही.असे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले. थकबाकी ही चौदा गावांची मिळून आहे.एकट्या तिळवणी गावची नाही.त्यामुळे तिळवणी गावास तीन वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गावातील महिलांचे पाण्याविना हाल होत आहेत. महिलांचे व नागरिकांचे होत असलेले हाल याची दखल घेऊन गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेस नवीन वीज कनेक्शन जोडणी बाबत योग्य ती कार्यवाही व्हावी.अन्यथा १ मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर तिळवणी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपोषण उपोषणास बसत आहेत,असा इशारा देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी याबाबत अनेक वेळा अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन चर्चा केली निवेदने दिले तरी देखील यावरती निर्णय न घेतल्याने आज तिळवणी गावावर ही वेळ आली आहे. मागील थकबाकी साठी महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा करण्यास मंजुरी देत नाहीत. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून पाणी योजनेसाठी गावाला वीज पुरवठा करून देण्यास भाग पाडावे असे सरपंच यांनी सांगितले.
आमदार राजू बाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, डॉक्टर सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावर,मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अधीक्षक अभियंता कोल्हापूर कार्यकारी अभियंता इचलकरंजी सह संबंधितांना निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत.









