खानापूर तहसीलदारांना विश्वकर्मा समाजाचे निवेदन : अहवाल सादर करूनही भरपाई देण्याकडे दुर्लक्ष
खानापूर : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विश्वकर्मा समाजाच्या लोकांची अनेक घरे व लोहार शाळा पडून प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र अद्याप सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. ही नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन विश्वकर्मा समाजाच्यावतीने शुक्रवारी तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी विश्वकर्मा समाज संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. उपतहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करून नुकसानभरपाई देण्यासाठी योग्य क्रम घेतले जातील, असे आश्वासन दिले. या निवेदनात तालुक्यात विश्वकर्मा समाजातील सुतार, लोहार यांची घरे व लोहार शाळा पडून मोठे नुकसान झाले आहेत.
या नुकसान झालेल्या घरांचा महसूल अधिकारी आणि पीडीओनी अहवाल तहसीलदारांकडे पाठविला आहे. मात्र अद्याप शासनाच्यावतीने नुकसानभरपाई देण्यात आली नाही. यासाठी तातडीने त्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी भरमाणी पाटील, विश्वकर्मा समाज विकास संघाचे अध्यक्ष जोतिबा सुतार व विनोद कम्मार, श्रीरंग सुतार, विजयकुमार बडगेर, अनंत सुतार, यशवंत सुतार, परशराम सुतार, गोपाळ सुतार, रामचंद्र सुतार, मष्णू सुतार, कृष्णा सुतार, गणपत सुतार, नागेश कम्मार, शकर बडगियार, संजय सुतार, गजानन सुतार, प्रल्हाद सुतार, प्रकाश सुतार, मोहन सुतार, गंगुबाई सुतार, लक्ष्मी सुतार आदी उपस्थित होते.
आमदार विठ्ठल हलगेकर यांनाही निवेदन
आमदार विठ्ठल हलगेकर यांनाही एक निवेदन सादर करण्यात आले. व या संदर्भात विश्वकर्मा समाजातील ज्या ज्या कुटुंबांची घरांची पडझड झाली आहे त्यांचा अहवाल घेऊन तातडीने तहसीलदारांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रवृत्त करावे, अशीही विनंती करण्यात आली.









