तालुका म. ए. युवा आघाडीतर्फे डॉ. एस. शिवकुमार यांना निवेदन
बेळगाव : सीमाभागातील 865 गावांमध्ये बहुसंख्येने मराठी भाषिक आहेत. अन्यायाने हा भाग कर्नाटकात डांबण्यात आला आहे. जिल्ह्यात 26 टक्के मराठी भाषिक आहेत. तरीदेखील प्रशासनाकडून सर्व परिपत्रके कन्नडमध्येच दिली जातात. शिवाय बसेसवरील फलक, वीजबिल, सातबारा उतारे कन्नड भाषेत दिले जातात. त्यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होण्याबरोबरच मराठी भाषिकांच्या हक्कावर गदा आणली आहे. या दडपशाहीची केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दखल घेऊन सीमाभागातील 865 गावांतील मराठी भाषिकांना मराठीतून परिपत्रके द्यावीत, अशी मागणी तालुका म. ए. समिती युवा आघाडीतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे साहाय्यक आयुक्त डॉ. एस. शिवकुमार यांची बेळगाव रेल्वेस्थानकावर भेट घेऊन देण्यात आले.
सीमाभागात कन्नडसक्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. येथील स्थानिक प्रशासन मराठी भाषिकांवर दडपशाही करीत आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात वाचा फोडून मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय हलविल्यापासून मराठी भाषिकांवर अन्याय वाढला आहे. येथील व्यावसायिक दुकाने, तसेच सरकारी कार्यालयांवर कन्नड फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांची कुचंबणा होऊ लागली आहे. याची दखल घेऊन हा अन्याय थांबवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, सचिव शंकर कोनेरी, सागर सांगावकर, यल्लाप्पा पाटील, अरुण जाधव, बसवंत पाटीलसह तालुका म. ए. समिती व युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.









