ग्रा. पं. सदस्यांचे जि. पं. ला निवेदन : पीडीओंना समज देण्याची जि. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : देवाचीहट्टी (ता. खानापूर) गाव बैलूर ग्रा. पंचायतीच्या व्याप्तीत येत असून गावामध्ये मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अधिकाऱ्यांकडून विकासकामांसाठी सहकार्य केले जात नसल्याने त्यांना ताकीद देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्रा. पं. सदस्यांतर्फे जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना देण्यात आले. देवाचीहट्टी गावातील अनेक विकासकामे रखडली आहेत. मूलभूत सुविधांअभावी नागरिकांना संपर्क साधणे कठीण झाले आहे. तोराळी येथील देवाचीहट्टी मुख्य रस्त्यापासून कृष्णा कवठणकर यांच्या शेतवडीपर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे, याबरोबरच गावातील इतर रस्त्यांचाही विकास करावा, गावामध्ये अंगणवाडी केंद्र नसल्यामुळे अंगणवाडी भरविण्यास अडचण येत आहे. यासाठी अंगणवाडी इमारत मंजूर करण्यात यावी, तसेच गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरुन रोगराईला कारण ठरत आहे. यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पीडीओ संतोष चौगुले, अकार्यक्षम असून गावच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. कामे वेळेत पूर्ण केली जात नसल्याने नागरिकांना ग्राम पंचायतीकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. विकासकामे राबविताना देवाचीहट्टी ग्रा. पं. सदस्यांना विश्वासात न घेता कामे केली जात आहेत. यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रदीप कवठणकर, विठ्ठल नाकाडी, सखुबाई पाटील आदी उपस्थित होते.









