पदवीपूर्व प्राध्यापक-विद्यार्थ्यांची मागणी: जागेसाठी दिले निवेदनही
बेळगाव : बेळगावच्या जिल्हा पदवीपूर्व विभागाला कायमस्वरुपी कार्यालय मिळत नसल्याने शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची अवस्था विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर अशी आहे. मागील पाच वर्षात कार्यालयाने पाच ठिकाणी स्थलांतर केल्याने कार्यालय शोधण्यातच विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पदवीपूर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. बेळगाव पदवीपूर्व विभागांतर्गत एकूण 147 कॉलेजचा समावेश होतो. कोणत्याही कामकाजासाठी पदवीपूर्व कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना कार्यालयात यावे लागते. केवळ बेळगाव तालुकाच नाही तर खानापूर, रामदुर्ग, बैलहोंगल, सौंदत्ती आणि कित्तूर यासह इतर तालुक्यातील प्राध्यापकांची शिक्षण विभागाच्या कार्यालयात ये-जा असते. सध्या हे कार्यालय वडगाव जेल शाळा येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये स्थलांतरित केले आहे. त्यामुळे शैक्षणिक जिल्ह्यातील प्राध्यापकांना कार्यालयापर्यंत पोहोचणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.
पदवीपूर्व शिक्षण विभागाला अद्याप कायमस्वरुपी जागा उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुरुवातीच्या काळात चव्हाट गल्ली येथे पदवीपूर्व शिक्षण विभागाचे कार्यालय होते. त्यानंतर काही दिवस ते क्लब रोड येथे हलविले. त्यानंतर गोंधळी गल्ली येथेही काही वर्षे कार्यालय थाटले. मार्च-22 पासून हे कार्यालय वडगाव जेल शाळा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून वडगावचे अंतर दूर असल्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून बस पकडून येळ्ळूर बसस्टॉपपासून पायपीट करत जेल शाळा गाठावी लागते. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात पदवीपूर्व शिक्षण विभागाचे कार्यालय सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांमधून केली जात आहे. यासंदर्भात काही लोकप्रतिनिधींनाही जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदनही देण्यात आले आहे.
मध्यवर्ती भागात कार्यालय स्थलांतरित करा
शहरापासून वडगाव येथील पदवीपूर्व शिक्षण विभागाचे कार्यालय दूर असल्याने मध्यवर्ती भागात कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी प्राध्यापक व विद्यार्थ्यांमधून करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात जागा उपलब्ध झाल्यास कार्यालय सुरू करण्यास कोणतीच अडचण नाही. बेळगाव महानगरपालिकेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
-एम. एम. कांबळे (सहसंचालक पदवीपूर्व शिक्षण विभाग)









