नगरविकासमंत्री भैरती सुरेश यांची बैठकीत सूचना : अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे
बेळगाव : सरकारच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यात नियोजित वेळेत इंदिरा कॅन्टीन सुरू करावे. पिण्याचा पाणीपुरवठा, कूपनलिकांची दुरुस्ती, पाईपलाईन घालणे आदी सेवाही वेळेत पुरविण्याची सूचना नगरविकासमंत्री भैरती सुरेश यांनी अधिकाऱ्यांना केली. सुवर्णविधानसौधमधील सेंट्रल हॉलमध्ये शुक्रवारी बेळगाव विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विकासकामांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. बेळगाव विभागातील बागलकोट, जमखंडी, मुधोळ तालुक्यात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यासाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे. नियोजित वेळेत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कॅन्टीन सुरू करण्याची सूचनाही मंत्र्यांनी केली. गोरगरिबांना उपयोग व्हावा यासाठी सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून आवश्यक त्याठिकाणी त्वरित इंदिरा कॅन्टीन प्रारंभ करावे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करू नये.
बेळगाव जिल्ह्यात नऊ कॅन्टीन आहेत. आणखी 28 कॅन्टीन सुरू करण्यासाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे, अशी माहिती नगरविकास कोषचे मल्लिकार्जुन कलादगी यांनी बैठकीत दिली. यावर बोलताना मंत्री भैरती सुरेश म्हणाले, गोकाक तालुक्यात सध्या एकच कॅन्टीन आहे. सरकारच्या मार्गसूचीनुसार 25 हजाराची लोकसंख्या असेल त्याठिकाणी इंदिरा कॅन्टीन सुरू करायचे आहे. गोकाक तालुक्याच्या कार्यक्षेत्रात 79 हजार लोकसंख्या असलेली ठिकाणेही आहेत. अशा ठिकाणी त्वरित कॅन्टीन सुरू करावे. ग्राम पंचायतींचा दर्जा वाढवून नगरपंचायत बनवून तेथे इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. कॅन्टीन सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची ठरते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. धारवाड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात सध्या 8 जुनी कॅन्टीन आहेत. 20 नवी कॅन्टीन सुरू करण्यासाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया सुरू आहे. हावेरीत 3 कॅन्टीन आहेत. त्याठिकाणी आणखी 7 कॅन्टीन सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. कॅन्टीन सुरू करण्यासंबंधी आवश्यक पावले न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा जारी करण्याचा इशाराही दिला.
या बैठकीत पिण्याच्या पाण्यासंबंधीही चर्चा झाली. पाणीपुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी. आवश्यक त्याठिकाणी नव्या कूपनलिका खोदाव्यात. निधीची कमतरता भासल्यास त्वरित सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी सूचना मंत्र्यांनी केली. बेळगाव येथील 38 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा अभाव नाही. मार्चपर्यंत नदीपात्रात पाणी उपलब्ध असते. जर टंचाई दिसून आल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. बेळगाव मनपाच्या कार्यक्षेत्रात 786 कूपनलिका आहेत. त्यामुळे बेळगावातही सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली. या बैठकीत पालिका प्रशासनमंत्री रहिम खान, आमदार गणेश हुक्केरी, आमदार विश्वनाथ वैद्य, आमदार राजू सेठ, आमदार महेश तम्मण्णवर, पालिका प्रशासन विभागाच्या संचालक एन. मंजुश्री, केयुआयडीएफसीचे व्यवस्थापक संचालक बी. शरथ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
हिडकलहून नव्या पाईपलाईनचा प्रस्ताव
हिडकल जलाशयापासून बेळगावपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी नवी पाईपलाईन घालण्यासंदर्भात आदेश आहे. वनखात्याकडून एनओसी मिळाली नाही. वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्याशी चर्चा करून सध्या आहे त्या पाईपलाईनशेजारीच नवी पाईपलाईन घालण्यासंदर्भात एनओसी द्यावी, अशी सूचना वनखात्याच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील पौरकार्मिकांना गृहभाग्य योजनेंतर्गत बांधकाम सुरू आहे. लवकरात लवकर ते पूर्ण करावे. विकासाबरोबरच महसूल वसुली, व्यापार परवाना वितरण आदी कामेही जलदगतीने होतील, याकडे लक्ष पुरविण्याची सूचना मंत्र्यांनी केली.









