डॉ. सोनाली सरनोबत यांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर तालुक्यातील जनता बेळगाव तालुका आणि शहरात ये-जा करण्यासाठी राज्य परिवहनच्या बसेसवर अवलंबून आहे. त्यांना शाळा-कॉलेज व नोकरीधंद्यासाठी बेळगावला यावे लागते. मात्र, अपुऱ्या बससेवेमुळे जनता त्रस्त आहे. अनेकवेळा विनंती करूनदेखील तालुक्यातील प्रमुख बसथांब्यांवर हल्याळकडून येणाऱ्या बस थांबविल्या जात नाहीत. ही बाब परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तरी त्यात सुधारणा झालेली नाही. अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन खानापूरला वाढीव बससेवा पुरविण्यात यावी, अशी मागणी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.
तालुक्यातील कक्केरी, चुंचवाड, करीकट्टी, रामापूर, सुरपूर, लिंगनमठ, सुरपूर केरवडा, घस्टोळी, द•ाr, भुऊणकी, मास्केनहट्टी, गोधोळी, अवरोळी, पारवाड, नंदगड आणि तावरगट्टी गावातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापाऱ्यांना अपुऱ्या बससेवेचा त्रास सहन करावा लागत आहे. बससेवा तोकडी असल्याने आलेली बस गर्दीने तुडुंब होत असते. विद्यार्थ्यांना तर फूटबोर्डवर उभारून लटकत प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी धावणाऱ्या काही बसेस कोरोना काळात रद्द केल्या आहेत. त्या आजही पूर्ववत झाल्या नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बेळगाव मार्केट, जिल्हा रुग्णालयापर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.









