महिला फेडरेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यामध्ये सरकारकडून महिलांसाठी शक्ती योजनेच्या माध्यमातून मोफत बस प्रवास सेवा सुरू केल्याने अनेक गोर-गरीब महिलांना याचा लाभ होत आहे. सरकारचा हा अत्यंत स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र अपुऱ्या बसेसमुळे याचा नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने त्वरित अधिक बस उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय फेडरेशन महिला संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली महिलांसाठी मोफत बससेवा अत्यंत उपयोगी ठरत आहे. यामुळे महिलांना प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. राज्य सरकारचा हा निर्णय योग्य असून महिलांसाठी अधिक उपयोगी ठरत आहे. मात्र सध्या अपुऱ्या बसेस असल्याने प्रवाशांनी बस तुडुंब भरत आहे. यामुळे चेंगराचेंगरी करत प्रवास करावा लागत आहे. प्रवास सुखद होत नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियोजितस्थळी योग्य वेळेत पोहोचणे अशक्य होत आहे. कामावर जाणाऱ्या महिलांसह इतर प्रवाशांना याचा त्रास होत आहे. विशेष करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेत बस मिळत नसल्याने मोठा फटका बसत आहे.
विद्यार्थ्यांचा लोंबकळत प्रवास
विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. बससेवा असली तरी प्रवाशांनी तुडुंब भरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त बस उपलब्ध करून द्याव्यात. बस वाहक आणि चालकांची नेमणूक करून घ्यावी. नागरिकांना प्रवासासाठी मुबलक बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शोभा होसमनी, कला सातेरी, उमा माने, मीरा मादार आदी महिला उपस्थित होत्या.









