रत्नागिरी :
तालुक्यातील वाटद एमआयडीसी भूसंपादनासंदर्भात मंगळवारी वाटद गावातील ग्रामस्थांची सुनावणी पार पडली. यावेळी प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र काही महत्वाच्या बाबींचा लेखी खुलासा शासनाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. गावात नक्की कोणता प्रकल्प येणार? तो प्रदुषणकारी असणार का? तसेच या प्रकल्पाचा आमच्या स्थानिक ग्रामस्थ, युवकांना काय फायदा होणार? अशा काही गोष्टींचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी असलेले निवेदन प्रांताधिकारी जीवन देसाई यांना दिले.
वाटद एमआयडीसीसंदर्भात हरकतींवर मंगळवारी वाटद गावातील ग्र्रामस्थांची सुनावणी प्रक्रिया येथील अल्पबचत कार्यालयात पार पडली. सकाळी 11 वाजण्याच्या सुनावणीसाठी वाटद गावातील हरकती दाखल केलेल्या 103 ग्रामस्थांपैकी 80 ग्रामस्थ सुनावणीसाठी हजर होते. यावेळी वाटद गावचे माजी सरपंच एकनाथ सखाराम धनावडे यांनी ग्रामस्थांच्या सह्यांचे एक निवेदन प्रांताधिकारी जीवन देसाई यांना सादर केले.
वाटद ग्रामस्थांकडून दिलेल्या निवेदनातून आमच्या गावात नक्की कोणता प्रकल्प होणार, याबाबत आम्हाला लेखी स्वरुपात माहिती सादर करावी, गावात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प होणार नाही, याबाबत लेखी स्वरूपात खात्री द्यावी, भविष्यात आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या आमच्या जमिनी संपादित झाल्यावर आमच्या मुला-बाळांना या प्रकल्पात नोकरी मिळणार का, याबाबतही लेखी शाश्वती देण्यात यावी, प्रकल्पासाठी आवश्यक तंत्रज्ञान शिकवण्यासाठी परिसरात त्या संदर्भातील प्रशिक्षण पेंद्र उभारण्यात यावे, प्रकल्पासाठी ग्रामस्थांच्या सार्वजनिक सेवा सुविधा जसे की वीज, पाणी यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची ग्वाही देण्यात यावी, परिसरातील अनेक जमिनींसदर्भात काही दावे प्रशासनाकडे प्रलंबित आहेत, ते लवकरात-लवकर निकाली काढावेत, गरीब ग्रामस्थांना अंधारात ठेवून काही शहरातील लोकांनी कमी भावाने या परिसरातील जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता हा शेतकरी प्रशासकीय लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात झालेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी व्हावी, प्रकल्पादरम्यान होणारी कुशल-अकुशल कामे इथल्याच स्थानिक कामगारांना मिळावीत, प्रकल्पात कोणतेही राहते घर हलवण्यात येणार नाही, याची खात्री द्यावी, या बाबींची लेखी माहिती मागण्यात आली आहे.
- जिजाऊ संघटनेच्या अर्जावर आज सुनावणी
वाटदसंदर्भात जिजाऊ संघटनेने केलेल्या अर्जावर बुधवार 9 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या अर्जावर 281 ग्रामस्थांच्या अर्जावर स्वाक्षऱ्या आहेत. गडनरळ येथील 12 अर्जावर गुऊवार 10 जुलै रोजी 11 वाजता सुनावणी होणार असून यात 60 खातेदार आहेत तर जिजाऊ संघटनेने केलेल्या अर्जावर सायंकाळी 4 वाजता सुनावणी होणार आहे. यावर 73 ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या सर्व अर्जदारांच्या अर्जावर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 चे कलम 32 (3) अन्वये सुनावणी होणार आहे.








