उपमहापौर रेश्मा पाटील यांची एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : शाहूनगर येथील वॉर्ड क्र. 33 मध्ये 24 तास पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी स्थानिकांनी उपमहापौरांकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत उपमहापौर रेश्मा पाटील यांनी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून तेथील पाणीसमस्या समजावून सांगितली. तसेच 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन घालण्याची सूचना केली आहे. शाहूनगर, लास्ट बसस्टॉप, विठ्ठलाई गल्ली व इतर कॉलनीमध्ये पाणीसमस्या गंभीर बनली आहे. गटारीचे पाणी विहिरींमध्ये जाते. याचबरोबर इतर पाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता 24 तास पाण्यासाठी पाईपलाईन घालावी, अशी मागणी जोर धरली आहे. एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लवकरच पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे.









