भोपाळमध्ये वायुदलाचा एअर-शो : निळ्याभोर आकाशात चित्तथरारक कसरती
वृत्तसंस्था/ भोपाळ
भोपाळच्या निळ्या आकाशात भारतीय वायुसेनेने आपल्या पराक्रमाचे प्रदर्शन केले. वायुदलाच्या वैमानिकांनी फायटर प्लेनद्वारे आपले शौर्य आणि धैर्य दाखवले. हवाई प्रात्यक्षिकांदरम्यान आग्रा, ग्वाल्हेर आणि गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवरून विमानांनी उड्डाण केले. यासोबतच भोपाळ विमानतळावरून काही विमाने आणि 3 ईएमई केंद्रावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. या शोमध्ये महिला पायलटही सहभागी झाल्या होत्या. सारंग हेलिकॉप्टरच्या टीमसोबत त्यांनी आकाशात चित्तथरारक कसरती केल्या.

भारतीय वायुसेनेच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त फ्लायपास्टचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल मंगुभाई पटेल हे प्रमुख पाहुणे तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. लष्कराचा हा पराक्रम पाहण्यासाठी भोपाळमधील नागरिक शनिवारी सकाळपासूनच व्हीआयपी रोड आणि लेक व्ह्यू रोडवर जमू लागले होते. यासोबतच घरांच्या छतावरही लोकांनी तळ ठोकला होता. भोपाळच्या लोकांचा उत्साह पाहता त्यांना हा शो खूप आवडला होता. मोठ्या संख्येने लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
स्कायडायव्हर्सनी आकाशात तिरंगा फडकवत कार्यक्रमाला सुऊवात केल्यानंतर चिनूक हेलिकॉप्टर तलावाजवळ पोहोचल्यावर नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. यानंतर हेलिकॉप्टर तिरंगा घेऊन पुढे आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी व समारोपप्रसंगी राष्ट्रगीत गायले गेले. एसयू-30, मिराज 2000, जग्वार, एलसीए तेजस, हॉक्स, हेलिकॉप्टर चिनूक, एमआय-17, व्ही-5, चेतक, एएलएच आणि वाहतूक विमान सी130 आणि आयएल-78 यांनी फ्लाय पास्टमध्ये भाग घेतला. सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम आणि आकाश गंगा टीम यांनीही कार्यक्रमात आपले कौशल्य दाखवले.
हवाई दल मध्यप्रदेशातील हवाई तळ वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जागेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यासोबतच तऊणांना हवाई दलाशी जोडण्यासाठी लवकरच मध्यप्रदेशात रॅलीही काढण्यात येणार असल्याचे एअर चीफ मार्शल विभाष पांडे यांनी सांगितले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र काही कारणास्तव ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हवाई दलाने तीन दिवस रंगीत तालीम केली. यानंतर 30 सप्टेंबरला अंतिम शो आयोजित करण्यात आला होता. याआधी 28 सप्टेंबरला फुल डेस रिहर्सल झाली होती. तीन दिवस चाललेल्या या सरावातही भोपाळच्या लोकांनी या एअर शोचा आनंद लुटला. भोपाळशिवाय आजूबाजूच्या भागातील लोकही एअर शो पाहण्यासाठी येथे पोहोचले. यासोबतच हा कार्यक्रम पाहण्यासाठी शाळकरी मुलेही मोठ्या संख्येने आली होती.









