जागतिक महिलादिनी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
पणजी ; महिला ह्या केवळ घरातीलच मुख्य व्यक्ती नसते, तर महिला ही गावाची, राज्याची किंबहुना देशाची कर्तृत्ववान माता असते. कारण महिला हा घरची जबाबदारी पार पाडताना ती अनेक पातळ्यांवर काम करते. संसार यशस्वी होण्यासाठी ती अनेक भूमिकेतून जाते. महिलांमध्ये सामर्थ्य व लढवय्यापणा हे गुण अंगी असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या जबाबदारीचा उपयोग सामर्थ्यशाली भारतासाठी कर्तृत्व सिद्ध करून करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजीतील गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम भाजपच्या महिला मोर्चातर्फे घेण्यात आला. यावेळी गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आरती बांदोडकर, महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत, सचिव रंजीता पै, उत्तर गोवा महिला अध्यक्ष गीता कदम, दक्षिण गोवा महिला अध्यक्ष परिमल सावंत उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ंवसुधैव कुटुंबकम’ हा नारा देताना देशातील महिलांना समान दर्जा देण्याचा प्रयत्न केला. 2014 मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा नारा देत याविषयी जागृती केली. त्यानंतर मुस्लिम महिलांसाठी जाचक ठरत असलेली तीन तलाक देण्याची पद्धत बंद करून त्याला कायदेशीर रूप दिले. महिलांना मान-सन्मान देण्यात भाजप सरकार कुठेच कमी पडत नाही आणि त्यामुळेच देशातील व राज्यातील महिला भाजप सरकारच्या पाठिशी उभ्या आहेत. महिलांनी विविध क्षेत्रात काम करताना उच्च शिक्षित होणेही गरजेचे आहे. सदानंद शेट तानावडे म्हणाले, भाजपने देशात प्रतिनिधित्व करताना महिलांच्या प्रगतीचा नेहमीच विचार केला आहे. त्यामुळेच आज सरकारच्या विविध योजना ह्या महिलांना फायदा मिळवून देणाऱ्या आहेत. राज्यातील महिलांनी भाजपला वाढविण्यात मोठा वाटा उचलला आहे. सत्तेत नसतानाही महिलांनी भाजपबरोबरच राहून हा पक्ष वाढविण्यास मोठी क्रांती केली आहे. विरोधात असताना विविध आंदोलने करून राज्यातील समस्यांवर आवाज उठवला होता. प्रत्येक महिलाही भाजपची ताकद असल्याने हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गोव्यात महिलाही प्रदेश व्हावी, यासाठी तुमची ताकद महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात सुलक्षणा सावंत यांनीही विचार मांडले. महिलादिन कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
म्हणून राज्यातील महिला कुशल कर्मचारी ठरल्या…
गोवा मानव संसाधन विकास महामंडळाची स्थापना केल्यापासून गोवा राज्यातील बेरोजगार व्यक्तींना आणि गोवा राज्यातील महिला कामगारांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे आज प्रशिक्षित आणि कुशल महिला कर्मचारी म्हणून गोमंतकीय महिलांना संधी मिळाली आहे. सध्या या महामंडळामार्फत 500 महिला काम करीत आहेत, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
सन्मानित करण्यात आलेल्या महिला अशा :
डॉ. अक्षया पावसकर (साहित्य), स्वेता च्यारी (तरंग व्यवसाय), रत्नमाला परब (व्यवसाय), हेमश्री गडेकर (व्यवसाय), स्त्री गर्जना ढोल पथक (संगीत), डॉ. नीना पाणंदीकर (शिक्षण), डॉ. पूनम संभाजी (बालरोगतज्ञ वैद्यकीय), स्वाती शेट्यो मळीक (पुरातत्व शास्त्रज्ञ आणि इतिहासकार), शकुंतला भरणे (गायक / संगीत), सरस्वती वेळीप (स्थानिक कारागिर व्यवसाय), दनुस्का दी गामा (क्रीडा), गुंजन नार्वेकर (क्रीडा), सपना सामंत (बातमीदार), रिद्धी आणि सिद्धी म्हापसेकर (फॅशन डिझायनर).









