हैदराबाद / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावरुन भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यात राजकीय युद्ध पेटले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारागृहात असणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंप्ती आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी ‘अशिक्षित व्यक्ती देशासाठी धोकादायक आहेत’ असे विधान पत्र लिहून केल्याने मोठा राजकीय वाद पेटला आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांचे पदवी प्रमाणपत्र दाखविण्याची मागणी केली होती. या मागणीवर भाजपने जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मोदींचे पदवी प्रमाणपत्र इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी केजरीवाल ते राजकीय हेतूने अमान्य करीत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. पंतप्रधान मोदींच्या शिक्षणाची एवढी चिंता करणाऱया दिल्ली सरकारने आपल्या कार्यकाळात दिल्लीतील शाळांची कशी दुर्दशा केली आहे, याकडे जरा लक्क द्यावे, असा खोचक सल्लाही भाजपने दिला. भाजप नेते हरिष खुराणा यांनी एक ट्विट करुन दिल्लीतील शाळांची दुर्दशा चव्हाटय़ावर आणण्याचे प्रतिपादन केले आहे. हे ट्विटही सध्या चर्चेत आहे.
दिल्लीत नापास होणाऱया मुलांसाठी विशेष शिक्षण दिले जाते. अशिक्षित मुलांपैकी कोणी भविष्यकाळात देशाचा पंतप्रधान होऊ नये, याची दक्षता आम्ही घेत आहोत, असे प्रत्युत्तर आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर हे युद्ध अधिकच भडकले आहे. दिल्ली भाजपच्या प्रत्येक नेत्याने केजरीवाल यांच्या विधानाचा समाचार घेतला असून मद्य धोरणात धुंद असणरे मुख्यमंत्री अद्याप जागे झालेले नाहीत, असा पलटवार केला आहे. गेले आठ दिवस दोन्ही पक्षांमध्ये या प्रश्नावरुन जोरदार धुमश्चक्री होत असलेली पहावयास मिळत आहे.









