ब्रॅम्प्टनमधील मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे 4 नोव्हेंबर रोजी एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ रविवार, 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील हिंदू-शीख ग्लोबल फोरमच्या कार्यकर्त्यांनी कॅनडाच्या दुतावासावर निषेध मोर्चा काढला. हिंदू संघटना आणि मंचाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला. ‘हिंदू आणि शीख एकत्र आहेत’ आणि ‘भारतीय लोक पॅनडातील मंदिरांची विटंबना सहन करणार नाहीत’ असे फलक घेऊन निदर्शक आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. तसेच दुतावासाबाहेर अतिरिक्त सैनिक तैनात केले होते. मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्स ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले.









