प्रकल्पाबाबत नागरिकांना प्रथम माहिती द्या : काम थांबविण्याची मागणी
बेळगाव : वीरभद्रनगर येथील जागेत महापालिकेच्यावतीने कचरा विघटन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मात्र याला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला असून या ठिकाणी कचराडेपो करण्यात येवू नये, अशी मागणी करून मनपाला निवेदन दिले होते. पण याकडे दुर्लक्ष करून प्रकल्प राबविण्यासाठी आटापिटा सुरू असल्याने येथील रहिवाशांनी सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन प्रकल्पाचे काम थांबवा, अशी विनंती केली.
परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी खुल्या जागांवर कचरा विघटन केंद्र सुरू करण्यात येत आहे. मात्र वीरभद्रनगर येथे हा प्रकल्प सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी कचराडेपो करण्यात येवू नये, अशा मागणीचे निवेदन महापालिकेला यापूर्वी देण्यात आले होते. नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. हा प्रकल्प राबविण्यास विरोध करण्यात आला असून यापूर्वी महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. पण आयुक्तांनी वेळ दिला नाही. त्यामुळे सोमवारी नगरसेवकांसह समाजाच्या ज्येष्ठमंडळींनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कचराडेपोबाबत आक्षेप असल्याचे सांगितले.
कचरा विघटन केंद्र सुरू केले जाणार असून कोणीही विरोध करू शकत नाही. आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षणात हे काम पूर्ण केले जाईल, असा इशारा उपस्थितांना दिला. त्यामुळे नागरिक आणि आयुक्तांमध्ये वादावादी झाली. हा प्रकल्प राबविण्यास आम्ही देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी कचरा विघटन प्रक्रियेची माहिती दिली. हुबळीमध्ये नागरिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात आल्याचे सांगितले.
बेळगावात हा प्रकल्प राबविताना कोणतीच माहिती दिली नसल्याची तक्रार नगरसेवक बाबाजान मतवाले यांनी केली. किमान नागरिकांना आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प कोणत्या प्रकारे राबविला जाणार आहे, याबाबतची माहिती देणे आवश्यक होते. पण अधिकारी कोणालाच विश्वासात घेत नाहीत, असा आरोप नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी केला. तर रस्ते, गटार, ड्रेनेजच्या वाहिन्या व जलवाहिन्या घालताना याबाबत नागरिकांना डेमो किंवा माहिती देऊनच काम करायचे का? अशी कोणतीच तरतूद नाही, असे उद्धट उत्तर महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी दिले. आयुक्तांच्या या वक्तव्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले.
नागरिकांना विश्वासात घेऊनच काम करा…
ज्या ठिकाणी तक्रार निर्माण होते, त्याठिकाणी नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे आयुक्तांना ठणकावून सांगण्यात आले. त्यामुळे हुबळीमध्ये राबविण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती नागरिकांना तसेच नगरसेवकांना देऊन या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, अशी सूचना आयुक्तांनी केली. प्रकल्पाबाबत माहिती देऊन नागरिकांना विश्वासात घेऊनच हे काम करावे, अशी विनंती नगरसेवक व नागरिकांनी केली.









