कोलकाता-अहमदाबादमध्ये पोस्टर्स जाळले; उत्तर प्रदेशात विधेयकाचे समर्थन केल्याबद्दल एकाला मारहाण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर या विधेयकाविरोधात देशात काही राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश दिसून आला.
उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिह्यांमध्ये पोलीस हाय अलर्टवर आहेत. लखनौमधील दर्गे आणि मशिदींवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेश अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अशफाक सैफी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असून त्यांच्या मेहुण्याला मारहाण करण्यात आली.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये मुस्लीम समुदायातील शेकडो लोक रस्त्यावर जमले. त्यांच्या पोस्टर्स आणि बॅनरवर ‘वक्फ बिल परत घ्या, यूसीसी नाकारा’ असा संदेश देण्यात आला होता. याप्रसंगी लोकांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. जमावाने ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या. या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतले.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील पार्क सर्कस क्रॉसिंगवर शेकडो लोक रस्त्यावर जमले होते. येथेही लोक वक्फ विधेयक रद्द करण्याची मागणी करणारे बॅनर आणि पोस्टर्स घेऊन निषेध करत आहेत. कोलकातामध्ये अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ लोकांनी फलक जाळले.
झारखंडची राजधानी रांचीमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. तसेच बिहारमध्येही लोक या विधेयकाविरुद्ध रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी विधेयकाविरुद्ध निदर्शने केली.









