‘म्हादई मुव्हमेंट’ची एनआयओसमोर निदर्शने : अहवाल गोव्याची बाजू कमकुवत करणारा
पणजी : गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीचे पाणी पळविण्यासाठी कर्नाटक सरकारने चालविलेल्या अरेरावीला भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कर्नाटकच्या मागण्यांना मूकपणे पाठिंबा देत असल्याचा आरोप आरजी पक्षाचे आमदार विरेश बोरकर आणि अध्यक्ष मनोज परब यांनी केला आहे. म्हादई नदीच्या पाणी वळवण्याच्या मुद्द्यावर दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या अहवालाला आक्षेप घेण्यासाठी ‘टुगेदर फॉर म्हादई मुव्हमेंट’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुऊवारी एनआयओ परिसरात निदर्शने केली. त्यावेळी आरजीचे वरील दोन्ही नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर अहवाल तयार करताना एनआयओ वैज्ञानिकांनी कर्नाटकाला झुकते माप देण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सदर अहवाल पक्षपाती आहे, असा आरोप बोरकर यांनी केला व सदर अहवालावर जोरदार टीका केली.
एनआयओच्या तीन वैज्ञानिकांनी हा अहवाल तयार केला आहे. त्यापैकी एक डॉ. टी शंकर हे मूळ कर्नाटकचे रहिवासी आहेत. त्यामुळे साहजिकच ते कर्नाटकाला झुकते माप व कर्नाटकच्या भूमिकेचे समर्थनच करतील हे कुणीच नाकारू शकणार नाही, असा दावा परब यांनी केला. पुढे बोलताना परब यांनी एक तर एनआयओकडून हा अहवाल का व कुणाच्या सांगण्यावरून तयार करण्यात आला आहे हे समजण्यास मार्ग नसल्याचे सांगितले. दुसरी गोष्ट म्हणजे एनआयओने सदर अहवाल तयार केला होता तर आजपर्यंत तो प्रकाशित, सार्वजनिक का करण्यात आला नाही, असे सवाल उपस्थित केले. त्यावरून गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचेच हे कारस्थान असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप परब यांनी केला.
बिगर गोमंतकीय वैज्ञानिक ‘नाटकी’
अशाप्रकारे गोव्याची बाजू कमकुवत करणारा अहवाल तयार करून या बिगर गोमंतकीय वैज्ञानिकांनी त्यांना गोव्याबद्दल कोणतीही आत्मियता आणि भावनिक संबंध नसल्याचेच दाखवून दिले आहे. अशा वैज्ञानिकांना सरकारने जबाबदार धरून जाब विचारला पाहिजे, अशी मागणी परब यांनी केली.









