पोलिसांनी राकेश टिकैत यांना रोखले
वृत्तसंस्था/ नोएडा
उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने जाण्यापासून रोखले आहे. हे शेतकरी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात नोएडाहून दिल्लीच्या दिशेने कूच करत होते. नोएडामध्ये दलित प्रेरणास्थळावर पोलिसांनी त्यांना रोखले आहे. यानंतर निदर्शक शेतकऱ्यांनी बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळानंतर त्यांनी रस्ता रिकामी करत दलित प्रेरणास्थळी निदर्शने केली आहेत. याचदरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अलीगढच्या टप्पलमध्ये रोखण्यात आले आहे.
ग्रेटर नोएडातील टप्पल येथे टिकैत यांना रोखण्यात आले, त्यांच्यासोबत सुमारे दीडशेहून अधिक समर्थक होते. तर दलित प्रेरणा स्थळाच्या दिशेने जाणाऱ्या निदशंकांना देखील नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेदरम्यान रोखण्यात आले आहे. दलित प्रेरणा स्थळावर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या निदर्शकांची रवानगी लुकसर तुरुंगात करण्यात आली आहे.
शेतकरी स्वत:च्या मागण्यांवरून सोमवारी महामाया फ्लायओव्हरवरून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. पोलिसांनी त्यांना दलित प्रेरणास्थळावर रोखले होते. अशास्थितीतही शेतकऱ्यांनी स्वत:ची भूमिका कायम ठेवत दलित प्रेरणास्थळीच निदर्शने केली, तेथूनही त्यांना हटविण्याचा प्रयत्न झाला आहे.
काही दिवसांपूर्वी शेतकरी नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांदरम्यान चर्चा झाली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मुदत मागून घेतली होती. शेतकऱ्यांनी ही मागणी मान्य करत दलित प्रेरणास्थळीच प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. 7 दिवसांत तोडगा न निघाल्यास दिल्ली कूच करू अशी घोषणा शेतकऱ्यांनी केली होती. परंतु त्यापूवैच शेतकऱ्यांच्या अटकेमुळे प्रकरण तणावपूर्ण झाले आहे. शेतकरी नेते आक्रोशात असून बैठक घेत पुढील रणनीति ठरविण्याच्या प्रयत्नात आहेत.









