राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन : बंगला जमीनदोस्त होईपर्यंत लढा सुरू राहणार
प्रतिनिधी / मडगाव
ओल्ड गोवा येथील जागतिक वारसास्थळाच्या संरक्षित जागेत उभा राहिलेला बंगला पाडण्याच्या बाबतीत चालढकल करण्यात येत असल्याचा दावा करत ‘कन्सर्न्ड र्सिटिझन्स’च्या झेंड्याखाली दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करून राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. सदर बंगला जमीनदोस्त करण्यात येईपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे, असे गुरुवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आले.
अँथनी डिसिल्वा, ग्लेन काब्राल, शंकर पोळजी, सय्यद इफ्तियाज, विकास भगत, अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांची यावेळी उपस्थिती होती. युनेस्को वारसास्थळाच्या क्षेत्रात नियम धाब्यावर बसवून वरील बंगल्याचे काम करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून आवश्यक कारवाई करण्याच्या बाबतीत चालढकल होत असल्याने वारसास्थळासंबधातील हा विषय आम्हाला दिल्लीला नेणे भाग पडले, असे अँथनी डिसिल्वा यांनी सांगितले. सदर विषय अखिल भारतीय असल्याने देशाचे लक्ष त्याकडे वेधणे आवश्यक होते. हा विषय चर्च, मंदिर वा मशिदीचा नसून सर्वांचा आहे, असे ते म्हणाले.
सदर विषय न्यायप्रविष्ठ असल्याचे काही जण सांगत असले, तरी तसे पाहिल्यास म्हादई प्रश्न देखील न्यायप्रविष्ठ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे. काही राजकारण्यांनी दिल्लीला गेल्याने आमच्यावर टीका केली. पण ‘युनेस्को’ने ओल्ड गोवा येथील ते ठिकाण संरक्षित वारसास्थळ म्हणून घोषित केलेले असल्याने हा विषय भारतीय पुरातत्त्व खात्याला कळणे आवश्यक होते, असे पोळजी यांनी सांगितले.
सदर वादग्रस्त बंगला पाडण्याच्या मागणीसाठी आम्ही सलग 240 दिवस साखळी उपोषण केले. तरी सरकारचे डोळे न उघडल्याने दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने करावी लागल्याचे अॅड. कुतिन्हो म्हणाल्या. राज्य सरकार हा विषय गंभीरपणे घेत नसल्याची टीका सय्यद इम्तियाझ यांनी केली. सरकारने सदर विषय न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून तो धसास लावण्याच्या बाबतीत वेळकाढूपणा न करता त्याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.









