सुवर्ण विधानसौधसमोर निदर्शने : कठोर कारवाई करण्याची मागणी, आंदोलनात जैन समाजबांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग
बेळगाव : हिरेकोडी येथील नंदीपर्वत जैन आश्रमाचे आचार्य 108 कामकुमार नंदी महाराजांच्या भीषण खुनाचा निषेध नेंदविण्यासाठी रविवारी सकाळी हलगा येथे जैन बांधवांनी निदर्शने केली. हलगा येथील बलाचार्य 108 सिद्धसेन मुनी महाराजांच्या सानिध्यात सुवर्णसौधजवळ आंदोलन करण्यात आले. जैन साधू व साध्वींना सुरक्षा पुरवावी, हिरेकोडी येथील घटनेने मुनी महाराजांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, सरकारने सुरक्षेची खात्री द्यावी, महाराजांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. या घटनेने केवळ जैन समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला धक्का बसला आहे. मुंगीलाही दुखावू नये, अशी शिकवण जैन समाजाची आहे. अशा समाजाच्या मुनींची हत्या करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न सिद्धसेन मुनी महाराजांनी उपस्थित केला. आंदोलनात जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साधू-संतांना संरक्षण पुरवा- नलीनकुमार कटिल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटिल यांनी जैन मुनींच्या निर्घृण हत्येचा निषेध केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. साधू-संतांना संरक्षण पुरवावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
मारेकऱ्यांवर कडक कारवाई करणार – डी. के. शिवकुमार
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही मुनींच्या हत्येचा निषेध केला असून सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. मारेकऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगतानाच सर्व स्वामीजींना संरक्षण पुरविण्याचे काम आपले सरकार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मारेकऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवा – चंद्रशेखर स्वामीजी (हुक्केरी हिरेमठ)
गेल्या पंधरा वर्षांपासून अहिंसा परमो धर्म या शांतीमंत्राचा हितोपदेश करणाऱ्या जैन मुनींची हत्या थक्क करणारी आहे. शांतीच्या पुजाऱ्यांवर हल्ला करणे, त्यांची हत्या करणे योग्य नाही. आचार्य कामकुमार नंदी महाराजांच्या मारेकऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवावा, अशी मागणीही हुक्केरी हिरेमठाच्या चंद्रशेखर स्वामीजींनी केली आहे.









