भारतीयांना करण्यात आले लक्ष्य : हजारो लोक उतरले रस्त्यांवर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियात रविवारी हजारो लोकांनी स्थलांतरितांच्या विरोधात मोर्चांमध्ये भाग घेतला आणि निदर्शनांच्या प्रचारसामग्रीत भारतीय स्थलांतरितांना देखील लक्ष्य करण्यात आले. परंतु ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या निदर्शनांची निंदा करत त्यांना द्वेष फैलावणारे आणि नियो-नाझींशी निगडित ठरविले आहे. ‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ नावाच्या या रॅलींसाठी जारी करण्यात आलेल्या जाहिरातीत भारतीय वंशाच्या लोकांना प्रामुख्याने दाखविण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येत भारतीय वंशाच्या लोकांचे प्रमाण 3 टक्के आहे.
100 वर्षांमध्ये ग्रीक आणि इटालियन जितके आले नाहीत, तितके भारतीय 5 वर्षांमध्ये दाखल झाले आहेत. हे केवळ एका देशातून आले आहेत. स्थलांतरितांमुळे सांस्कृतिक प्रभाव पडतो, हा काही किरकेळ सांस्कृतिक बदल नाही, संपत्तीचे आंतरराष्ट्रीय शोषण करता येऊ शकेल असे कुठलेही आर्थिक क्षेत्र ऑस्ट्रेलिया नाही असे निदर्शकांच्या हातातील पत्रकावर नमूद होते.
मोर्चापूर्वी फेसबुकव जारी करण्यात आलेल्या प्रचारसामग्रीत भारतीयांचाही उल्लेख करण्यात आला होता. 2013-23 पर्यंत भारतीय वंशाच्या लोकांची संख्या जवळपास दुप्पट होत सुमारे 8 लाख 45 हजार 800 झाली आहे. सामूहिक स्थलांतरामुळे ‘आमच्या समुदायांना एकत्र बांधणाऱ्या बंधनांनाच तोडल्याचा दावा मार्च फॉर ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइटवर करण्यात आला आहे. सामूहिक स्थलांतर संपुष्टात आणण्याची मागणी करत असल्याचे या ग्रूपने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे.
सिडनी-मेलबर्नमध्येही निदर्शने
सिडनी, मेलबर्न, कॅनबरा आणि अन्य शहरांमध्येही मोर्चा आयोजित करण्यात आला. सिडनीतील मोर्चाच्या विरोधात रिफ्यूज अॅक्शन कोएलिशनची रॅली झाली,ज्यात शेकडो लोक सामील झाले. तर पोलिसांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेकडो अधिकाऱ्यांना तैनात केले होते. मेलबर्नमध्ये पोलिसांची निदर्शकांसोबत झटापट झाली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
राजकीय पक्षांचा निदर्शनांना विरोध
या मोर्चांची सर्व राजकीय पक्षांनी निंदा केली आहे. मार्च फॉर ऑस्ट्रेलिया रॅलीची आम्ही कठोर निंदा करताहे. याचा उद्देश सामाजिक सौहार्द वाढविणे नाही. द्वेष पसरविणाऱ्या आणि आमच्या समुदायांना विभागणाऱ्या रॅलींचे आम्ही समर्थन करत नाही. या रॅली नियो-नाजी संघटनांकडून आयोजित करण्यात आल्या होत्या असे ऑस्ट्रेलियाचे कामगारमंत्री मरे वाट यांनी म्हटले आहे. सामाजिक एकतेला विभागू पाहणाऱ्या आणि कमकुवत करू पाहणाऱ्या लोकांसाठी आमच्या देशात कुठलेच स्थान नाही. आम्ही या रॅलींच्या विरोधात आधुनिक ऑस्ट्रेलियासोबत उभे आहोत असे गृहमंत्री टोनी बर्क यांनी स्पष्ट केले.









