2014 पासून केला जातोय पाठपुरावा : पहिल्या रेल्वेगेटजवळील दुभाजकावर घातलेले बॅरिकेड्स विद्यार्थी, वृद्ध,प्रवाशांना धोकादायक
प्रतिनिधी /बेळगाव
पहिल्या रेल्वेगेटजवळील दुभाजकावर घालण्यात आलेले बॅरिकेड्स शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि बसप्रवाशांना धोकादायक ठरत आहेत. दुभाजक ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे येथील बॅरिकेड्स हटविण्यात यावेत, याकरिता पुन्हा एकदा आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले.
येथील ज्येष्ठ नागरिक सुभाष घोलप यांनी कित्येक वर्षांपासून बॅरिकेड्स हटविण्यासाठी आंदोलन छेडले आहे. दुभाजकावर घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे वाहनधारकांना वळसा घालावा लागतो. वाहनधारकांना शिस्त लावण्याच्यादृष्टीने प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र याचा फटका शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि महिलांना बसत आहे.
दुभाजकाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. तर उर्वरित दुभाजकाची भिंत उंच असल्याने यावरून ये-जा करणे वृद्ध नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने अडीच फूट उंचीच्या दुभाजकाच्या भिंतीवर चढून रस्ता ओलांडावा लागतो. विशेषत: रेल्वेफाटकाच्या पलीकडील बाजूस भाजी मंडईसह दैनंदिन वापराच्या वस्तू मिळत असतात. तसेच विविध शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठ असल्याने मंडोळी रोड तसेच या परिसरातील रहिवाशांना रेल्वेफाटकाच्या पलीकडे जाणे भाग पडते. पण या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल घेऊन जाण्यासाठी कॉर्पोरेशन बँकेपर्यंत जाऊन वळसा मारून यावे लागते. अन्यथा दुसऱ्या रेल्वेफाटकाकडून शाळेला जावे लागते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची फेरी वाढत आहे.
तसेच महिलांनादेखील दुभाजकांवरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. येथील समस्या सर्वसामान्य नागरिकांना डोकेदुखीच्या बनल्या आहेत. दुभाजकावर बॅरिकेड्स घालण्यात आल्याने काँग्रेस रोडवरून ये-जा करणारे वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवित असतात. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. एकीकडे बॅरिकेड्सची अडचण आणि दुसरीकडे वाहनांचा वेग त्यामुळे रस्ता कसा पार करायचा? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी बॅरिकेड्स हटविण्यात यावेत, अशा मागणीसाठी सुभाष घोलप यांनी 2014 पासून अनेकवेळा आंदोलने छेडली. महापालिका ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला. राष्ट्रपती व पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनादेखील निवेदन दिले. पण या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. मात्र घोलप यांनी आंदोलन मागे घेतले नाही. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येचे निवारण करण्यासाठी शुक्रवारी पुन्हा एकदा बॅरिकेड्सच्या ठिकाणी निदर्शने केली.
यावेळी परिसरातील रिक्षाचालक, व्यावसायिक, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि डॉ. मदन शहा यांच्यासह नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.









