हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर : 17 पोलीस-अधिकारी जखमी
बेळगाव : बंदोबस्तावरील पोलीस, अधिकारी व सरकारी वाहनावर दगडफेक करून महामार्ग अडवल्याप्रकरणी येथील हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात पंचमसाली समाजाच्या आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली असून यामध्ये सहा प्रमुख नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी कोंडसकोप्पजवळ पंचमसाली समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवांचा मेळावा भरविण्यात आला होता. या मेळाव्यानंतर सुवर्णविधानसौधला घेराव घालण्याची हाक देण्यात आली. त्यावेळी आंदोलक व पोलीस यांच्यात झटापट झाली. दगडफेकीत पोलीस जखमी झाले आहेत. तर सरकारी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या लाठीहल्ल्यात पंचमसाली आंदोलकही जखमी झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे बळाचा वापर केल्याचे सांगत लाठीहल्ल्याचे समर्थन केले आहे. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आंदोलकांवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.
निंगाप्पा शिवाप्पा बनद, रामगौडा रुद्रगौडा फकिरगौडर, उमेश गुरुलिंगप्पा इंगळेवार, मंजुनाथ भेंडीगेरी, मंजुनाथ शंकऱ्याप्पा गुम्मगोळ, रुद्रगौडा या सहा जणांसह इतर आंदोलकांवर भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 109(1), 118(2), 117(2), 352, 351(2), 132, 121, 223, 324, 189, 189(3), 191(2),(3) सहकलम 190 सह सार्वजनिक मालमत्ता संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी ठाण मांडले. त्यावेळी आम्ही त्यांना समजावले. महामार्ग रोखता येत नाही. तुम्हाला निश्चित केलेल्या जागेवर जा, अशी सूचना देण्यात आली. वारंवार सांगूनही आंदोलकांनी पोलिसांचे ऐकले नाही. उलट अधिकारी व पोलिसांवर चप्पलफेक करण्यात आली. पोलीस व परिवहन मंडळाच्या 9 वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीत 17 अधिकारी व पोलीस जखमी झाले आहेत. त्यामुळे सरकारी कामात अडथळे आणण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व पोलीस अधिकाऱ्यांवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









