सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ यांचा इशारा
ओटवणे | प्रतिनिधी
लाखो रुपये खर्च करूनही माडखोल ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे गावातील स्ट्रीट लाईट असून नसल्यासारखी आहे. याचा फटका रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना बसत आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी १९ ऑगस्टपर्यंत गावातील सर्व रस्त्यावरील स्ट्रीट लाईनवर ब्रॅकेटचे दिवे बसविण्यास सुरुवात न केल्यास बुधवारी २० ऑगस्ट रोजी माडखोल ग्रामपंचायतच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा माडखोल ग्रामस्थांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ यांनी दिला आहे. माडखोल ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून गावातील सर्व स्ट्रीट लाईनवर ब्रॅकेट शिवाय दिवे बसवल्याने सदर दिवे अल्पावधीतच निकामी होऊन बंद पडतात. दिवे बंद पडल्यानंतर प्रशासनाचे अनेक लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. पर्यायाने ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थांना सध्या अंधारातून रस्त्यातून जावे लागत आहे. ग्रामस्थ दिवाबत्ती कर भरतात. मात्र गावात स्ट्रीट लाईटची अवस्था दयनीय आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्राम पंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे दिवे बदलण्याबाबत ग्रामसभेमध्ये ठराव घेवूनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. सध्या पावसाळ्यात रस्त्यावर उजेड नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामपंचायत प्रशासनात सरपंचांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांच्या कागदपत्रांचीही वेळीच पूर्तता होत नाही. तसेच विकास कामे ही नित्कृष्ट दर्जाची झाली आहेत. तसेच प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारासह अकार्यक्षमतेमुळे कोट्यावधी रुपयाचा निधी अखर्चित राहिल्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. यात गावाचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे गावातील सर्व वाड्यातील रस्त्यावर स्ट्रीट लाईटवर ब्रॅकेटचे दिवे लावण्याची कार्यवाही १९ ऑगस्ट पर्यंत न केल्यास २०ऑगस्ट रोजी ग्रामस्थांसह आंदोलन छेडण्याचा इशारा राजकुमार राऊळ यांनी दिला आहे.









