शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन : महामार्गाला पोलीस छावणीचे स्वरुप : पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
वार्ताहर/कोगनोळी
बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या होणाऱ्या महामेळाव्यास पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने भगवी रॅली कोल्हापूरहून बेळगावकडे निघाली होती. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा पुलावर आले असता कर्नाटक पोलिसांनी या रॅलीस रोखून धरले. बेळगावकडे जाण्यासाठी शिवसैनिक सरसावले असता पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली. शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत रस्त्यावरच ठिय्या मारला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत बेळगावला जाणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. मात्र सर्वच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
असाच प्रकार सुरू राहिल्यास कर्नाटकच्या कोणत्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. कर्नाटक शासनाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव या ठिकाणी सोमवारपासून सुरू झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास पाठिंबा देण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना उबाठा गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते बेळगावच्या दिशेने निघाले होते. या सर्वांना कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांनी अटकाव केला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी बेळगावकडे जाणारी वाहतूक रोखून धरण्यात आली होती. पोलिसांनी एकेरी मार्गाने ही वाहतूक सुरू केली. बेळगावकडे जाण्यासाठी रोखल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. त्या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे पोलिसांची मोठी धावपळ झाली. तातडीने त्यांनी कोल्हापूरच्या दिशेने रोखलेली वाहतूक एकेरी मार्गाने सुरू केली. दरम्यान पोलीस वाहनातून प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
याप्रसंगी बोलताना विजय देवणे म्हणाले, बेळगाव, निपाणी, कारवार, भालकी या भागातील मराठी भाषिकांच्यावर कर्नाटक शासन सातत्याने अन्याय करत आहे. बेळगाव येथील अधिवेशनास जात असताना आम्हाला कर्नाटक ऐवजी आमच्याच महाराष्ट्राच्या पोलिसांनी अडविले. मग महाराष्ट्रात सरकार कोणाचे आहे? हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम जाहीर करावे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही कर्नाटकात जात असल्याचे पत्र आठ दिवसांपूर्वीच दिले असतानाही आम्हाला सीमेवर अडविण्यात आले.
मात्र आम्ही कोणत्याही मार्गाने कर्नाटकात प्रवेश करून भगवा झेंडा फडकवू. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सोमवारी पहाटेच अटक केली. समितीच्या कार्यकर्त्यांना महामेळावा घेण्यास विरोध करण्यात येत आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. तसेच आम्ही कर्नाटकच्या कोणत्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. संजय पवार म्हणाले, कर्नाटक-महाराष्ट्राचा रेंगाळत असणारा प्रश्न केंद्राने तातडीने लक्ष घालून सोडवावा. सीमाभाग हा मराठी भाषिकांचा आहे. कर्नाटकाने त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे. तो भाग आम्ही मुक्त करणारच. सीमाभागातील मराठी बांधवांच्या बरोबर महाराष्ट्रातील मराठी बांधव कायमपणे पाठीशी राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसैनिकांना घेतले ताब्यात
सुनिल मोदी म्हणाले, मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना आम्ही शिवसैनिक सातत्याने सीमाभागात येऊन आंदोलन करतो. यावेळी कर्नाटक पोलिसांकडून आपली अडवणूक करण्यात येते. मात्र अन्यायाच्या ठिकाणी न्याय मागत असताना कर्नाटक पोलिसांकडून आपल्याला कोणतीच दार दिली जात नाही. तर त्याचे महाराष्ट्रात परिणाम दिसून येतील असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी विजय देवणे, संजय पवार, सुनिल मोदी, जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर या सर्वांना सोडून देण्यात आले.
निपाणीतून तीन तास आंतरराज्य बससेवा ठप्प
बेळगाव येथील मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेते व कार्यकर्त्यांना कोगनोळी टोलनाका येथे अडवल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्याचा आंतरराज्य बस वाहतुकीवर परिणाम झाला. सोमवारी सकाळी 8.30 ते 11.30 वाजेपर्यंत निपाणीतून महाराष्ट्रात होणारी बस वाहतूक ठप्प झाली होती. 11.30 नंतर मात्र वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारपासून बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सीमाभागातील मराठी भाषिकांकडून महामेळावा आयोजित केला जातो. या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे महामेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरातील शिवसेनेसह अन्य पक्षांचे नेते व कार्यकर्ते जात होते. त्याचवेळी त्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोलनाका येथे अडवल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले.









