हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्षा मिनाक्षी हित्तलमणी यांचा निर्णय
वार्ताहर /हिंडलगा
येथील मध्यवर्ती कारागृहात बसविण्यात आलेल्या मोबाईल जॅमरमुळे मोबाईल सेवा सर्व ठप्प झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जॅमरची तीव्रता वाढविल्याने हिंडलगा परिसरातील आंबेवाडी, मण्णूर, सुळगा (हिं.), बेनकनहळ्ळी, गणेशपूर भागातदेखील याचा परिणाम झाल्याने नागरिक व मोबाईलधारक हैराण झाले आहेत. बँकिंग, सोसायटी व्यवहार, ग्राम पंचायतमार्फत मिळणारी कागदपत्रे, मयत-जन्म दाखला, छोटे-मोठे आर्थिक व्यवहार, हॉटेल व्यवसाय, आवश्यक संदेश, विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत आवश्यक असणारी महत्त्वाची माहिती, पतसंस्था या सर्वांवर परिणाम झाल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. जीओचे नेटवर्क बंद पडल्याने महत्त्वाच्या कामासाठी संदेश देणे कठीण झाले आहे.
आश्वासनाची पूर्तता नाही
पूर्वी कारागृहाच्या मर्यादेत जॅमरची तीव्रता होती त्यामुळे जनतेला त्रास झाला नव्हता. परंतु सध्या जॅमरची क्षमता वाढविल्याने कारागृहाबाहेर देखील याचा परिणाम झाला आहे. याकरिता हिंडलगा ग्राम पंचायतमार्फत दि. 17 फेब्रुवारी रोजी कारागृह अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांना निवेदन दिले होते. त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून पाच ते सहा दिवसांत तीव्रता कमी करण्याचे आश्वासन दिले होते. रास्ता रोकोत ग्रा. पं. सदस्य, सदस्या, नागरिक, विविध संघटना, व्यापारी वर्ग, आर्थिक संस्था यांचा सहभाग राहणार आहे. तरी परिसरातील गावातील नागरिकांनी देखील सहभागी व्हावे, असे कळविले आहे.
जॅमरमुळे विविध सेवांवर परिणाम…
शाळा, पोस्ट, सरकारी कार्यालये यावरदेखील याचा परिणाम झाला आहे. परंतु दिलेल्या निवेदनानंतर कारागृहामार्फत जॅमरची तीव्रता कमी न केल्याने मंगळवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 10 वा. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर कारागृहासमोर हिंडलगा ग्राम पंचायतीतर्फे रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्षा मिनाक्षी हित्तलमणी यांनी कळविले आहे.
-हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्षा मिनाक्षी हित्तलमणी










