विकृत मनोवृत्तीच्या त्या युवकाला अटक : पोलिसांची भूमिका संशयास्पद
प्रतिनिधी/ खानापूर
विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने युवती आणि महिलांचे फोटो क्लोनिंग करून अश्लील फोटो इन्स्टाग्रामसह समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने खानापूर तालुक्यात खळबळ माजली असून या युवकाला जोपर्यंत अटक केली जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा घेत महिला आणि युवतींनी खानापूर पोलीस स्थानकावर शनिवारी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लोकोळी येथील विकृत मनोवृत्तीच्या मंथन दशरथ पाटील या युवकाने महिला आणि युवतींचे फोटो क्लोनिंग करून ते फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केले. याबद्दल खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सदर युवकाला अटक करण्यात चालढकल करण्यात आली. याच्या निषेधार्थ महिलांनी खानापूर पोलीस स्थानकावर मोर्चा काढून आंदोलन केले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर खानापूर तालुक्यात एकच खळबळ माजली. याबाबत गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांची बैठकही झाली व सदर तरुणाविरुद्ध खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे ठरले. 2 नोव्हेंबर रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. परंतु, अटक झाली नाही. म्हणून महिलांनी शनिवारी आंदोलन केले. यावेळी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक एम. गिरीश यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलांनी ठाम भूमिका घेत आपण हटणार नाही, असे सांगितले.
या प्रकारानंतर दोन तासांनी मंथन पाटील याला पोलिसांनी खानापूर पोलीस स्थानकात आणले आणि नंतर महिलांना अक्षरश: पिटाळून लावले. खानापूर पोलिसांनी त्याच्याविरोधात अत्यंत साध्या प्रकारचा गुन्हा नोंद करून त्याला जामीन मिळावा, यादृष्टीनेच नोंद केली असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यासंदर्भात सोमवारी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे महिलांनी स्पष्ट केले.
अत्यंत हीन दर्जाचे कृत्य करूनही पोलीस मंथन याला पाठीशी का घालत आहेत? असा प्रश्न लोकोळी ग्रामस्थांनी केला आहे. या मोर्चामध्ये खानापूर व लोकोळी येथील बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. यासंदर्भात दोषीवर तीव्र कारवाई न झाल्यास अशी प्रकरणे वाढीस लागतील, अशी भीतीही महिलांनी व्यक्त केली आहे.









