मोपावर ब्लू टॅक्सी स्टँड अधिसूचित करणार : वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची ग्वाही
पेडणे : पेडणे येथील आंदोलनकर्त्या टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री व आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासमवेत आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यात 15 दिवसांच्या आत मोपा विमानतळावर येलो ब्लॅक टॅक्सी स्टॅन्ड ऐवजी ब्लू टॅक्सी स्टॅंड उपलब्ध कऊन देणार अशी ग्वाही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. त्यामुळे हे आंदोलन दोन आठवडे स्थगित करण्यात येत असल्याची माहिती टुगेदर फॉर मोपा एअरपोर्ट टॅक्सी संघटनेचे भास्कर नाऊलकर यांनी पत्रकारांना दिली. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हक्काचा टॅक्सी स्टॅँड उपलब्ध व्हावा यासाठी 1 मे पासून टॅक्सी व्यावसायिकांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासोबत मंगळवार दि. 9 मे रोजी संयुक्त चर्चा झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत येलो ब्लॅक टॅक्सी स्टॅण्ड ऐवजी ब्लू टॅक्सी स्टॅण्ड उपलब्ध करून देण्यासाठी अधिसूचना काढली जाईल, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. पंधरा दिवसांच्या आत टॅक्सी स्टॅण्ड अधिसूचित झाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनातील बहुतेक अटी मान्य झाल्याचे संकेत मिळाले आहेत. मोपा विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यातील ज्यांनी टॅक्सी घेतल्या असतील तर त्यांना प्राधान्य द्यावे, पेडणे वाहतूक खात्याकडे एकूण 1342 अर्ज टॅक्सी व्यावसायिकांनी यापूर्वी सादर केले आहेत, त्या सर्वांना परवाने द्यावेत, विमानतळावर काउढंटरसाठी जीएमआर कंपनीने जी नियम केले आहेत ते शिथिल करावेत. अनामत रक्कमेत सूट द्यावी अशा मागण्या होत्या. त्यातील बहुतेक मागण्या मान्य झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिल्याची माहिती भास्कर नाऊलकर यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे चर्चा करून टॅक्सी स्टॅण्ड अधिसूचित करण्यासाठी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ज्या पद्धतीने पाठिंबा दिला त्याच पद्धतीने स्थानिक पत्रकारांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानत असल्याचे भास्कर नारूलकर यांनी सांगितले.
एकत्रित व्यवसाय करण्याचा निर्धार
मोपा विमानतळावर ब्लू टॅक्सी स्टॅण्ड झाल्यानंतर ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या व्यावसायिकांना प्राधान्य शिवाय पेडणेतील इतर जे टॅक्सी व्यावसायिक आहेत त्या सर्वांनाही सामावून घेतले जाईल, असा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेत जर एखादी दुसरी संघटना या आंदोलनापासून दूर असेल तर त्यांनीही या संघटनेमध्ये यावे. ब्लू टॅक्सी स्टॅंड झाल्यानंतर सर्व अंादोलनकर्त्यांनी एकत्रित व्यवसाय करण्याचा निर्धार केला.









