अपघातांचे प्रमाण वाढले : प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष, नागरिकांची गैरसोय
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांकडून येत्या काही दिवसात मोठे आंदोलन केले जाणार आहे. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना ये-जा करणेही अवघड झाले आहे. अनगोळ येथील रेल्वेगेट बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक वाढली आहे. परंतु, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
रांगोळ्या घालून केलेले अनोखे आंदोलनही ठरले कुचकामी
पंधरा दिवसांपूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्तीबाबत आंदोलन केले होते. दररोज शेकडो वाहने याच मार्गाने ये-जा करीत असल्याने धोका वाढला आहे. उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने दुचाकी वाहन घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे खड्ड्यांभोवती रांगोळ्या घालून अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
पंधरा दिवसांचा अल्टिमेटही फोल
प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेट देण्यात आला होता. तरीदेखील काम पूर्ण करण्यात आले नसल्याने गुरुवार दि. 7 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हे आंदोलन पुढील आठवड्यात घेतले जाणार आहे. दररोज उद्यमबाग येथे शेकडो कामगार ये-जा करीत असतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
पावसामुळे आजचे आंदोलन स्थगित
रेल्वे उड्डाणपुलावरील खड्डे बुजवावेत, यासाठी जुलै महिन्यात पोलिसांसह संबंधित सर्व कार्यालयांना निवेदन देण्यात आले होते. तरीदेखील रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे गुरुवारी आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ते स्थगित करण्यात आले असून, पुढील आठवड्यात आंदोलन केले जाणार आहे.
– विनायक गुंजटकर, माजी नगरसेवक.









